नगर -भविष्यात व्यवसाय सुरू करताना व्यापाऱ्यांसमोर अनेक अडचणी असतील. सरकारी मदत पोचल्याशिवाय बंद पडलेली ही व्यवस्था पुन्हा कार्यान्वित होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे व्यावसायिकांना बूस्टर डोस द्यावे लागतील. त्यासाठी नगरच्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अडचणी तत्काळ सरकार दरबारी मांडू. त्यासोबत भविष्यात आणखी मदत मिळविण्यासाठी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी आज प्लायवूड व्यापाऱ्यांना दिले.पैसेही नको अन् निधीही नको.
काहीकाळ फक्त सवलती हव्यात, अशी भूूमिका नगरमधील प्लायवूड व्यापारी असोसिएशनने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात मांडली होती. या व्यापाऱ्यांच्या पदाधिकारी व सदस्यांची आज आमदार जगताप यांनी बैठक घेतली. संघटनेचे अध्यक्ष जेठाभाई पटेल, सचिव शैलेश मुनोत, सहसचिव मुकेश शिंगवी, खजिनदार संजय कलानी, चेतन भंडारी, राकेश गांधी आदींसह व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. सर्वच क्षेत्रांतील व्यापारी अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारला धोरण ठरवावे लागेल. कापड बाजार, सराफ बाजारही अडचणीत आहे.
या संदर्भात सरकारकडे विशेष पाठपुरावा करावा लागेल. मात्र, राज्यातील सर्वच व्यापाऱ्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील संपर्क करुन त्यांच्यासमोर व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या जातील, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क
नगरमधील व्यापाऱ्यांच्या या अडचणी सरकारकडे तत्काळ मांडता याव्यात, यासाठी नगरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आमदार संग्राम जगताप यांनी बैठकीतूनच फोन लावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्वच व्यापाऱ्यांच्या संदर्भात भूमिका मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.