प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याबाबतचे गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे. त्यावर योग्य त्या समस्या सोडवण्याबाबतचे आश्वासनही संघटनेला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या आग्रहामुळे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहविचार सभा घेण्यात आली. या सभेला पुणे विभागीय शिक्षण संचालक औदुंबर उकिरडे, सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर, शिक्षण उपनिरीक्षक धनाजी बुटे, लेखाधिकारी अनिल फुंदे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई चे सचिव शांताराम पोखरकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ पुणे विभागाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा पुणे विभागाचे सचिव प्रसाद गायकवाड, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, आदिनाथ थोरात, हरिश्चंद्र गायकवाड, महेंद्र गणपुले, मधुकर नाईक, तबाजी वागदरे, भानुदास रिठे, चंद्रकांत मोहोळ, कल्याण बरडे आदी उपस्थित होते.
अघोषित शाळा, वर्ग तुकडयांचे त्रृटी पूर्तता प्रस्ताव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय व आपल्या कार्यालयात प्रलंबित आहेत ते संचालक कार्यालयास त्वरीत सादर करावेत, माध्यमिक शाळांच्या स्वःमान्यता तालुकानिहाय कॅम्प आयोजित करावेत, तातडीने संच मान्यता मिळाव्यात, भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, टप्पा अनुदानातील शाळांचे वेतन नियमित व्हावेत, वेळेवर अनुदान उपलब्ध व्हावे, वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातातील कामकाजाची अनियमितता दूर करावी, प्रशासकीय पदांना वेळेत मान्यता मिळाव्यात, वैयक्तिक मान्यतांची व शालार्थ आयडीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढवावी आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.