हिंगोली – मराठवाड्यात स्वतःची इमारत नसलेल्या ३४३९ अंगणवाडी बांधकामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ३८६.८८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता हा निधी जिल्हा नियोजनासह इतर योजनेतून उपलब्ध करून घेण्याच्या सूचना महिला बालविकास विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम कसे पूर्ण करावे, हा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहणार आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एकूण १८९७७ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांतून सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक बालके येतात. या बालकांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जातो. याशिवाय प्राथमिक स्तरावरील आकार हा अभ्यासक्रम देखील शिकवला जातो. मात्र यापैकी ४७२४ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीमध्ये चालतात. त्यातून अपुऱ्या जागेमुळे बालकांच्या जागेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
मराठवाड्यात स्वतःची इमारत नसलेल्या ४७२४ पैकी जागेच्या उपलब्धतेनुसार ३४३९ अंंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अंगणवाड्यांसाठी तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार ३८६.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या अंगणवाड्यांना तीन वर्षांत का होईना हक्काची इमारत मिळणार असल्याने स्थानिक प्रशासनासोबच पालकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला होता.
त्यानंतर शासनाच्या महिला बालकल्याणविभागाने पत्र पाठवले आहे. त्यामध्ये अंगणवाडी बांधकामासाठी तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजनसमिती, मानव विकास मिशन, स्थानिकआमदार विकास निधीतून बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
जिल्हा नियोजन समिती व मानव विकास मिशनमध्ये महिला-बाल कल्याणसाठी काही निधी राखीव असला तरी तो अपुरा आहे. शासनाने स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना स्थानिक पातळीवरूनच निधी उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे तीन वर्षांत ही कामे पूर्ण करणे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
अंगणवाड्या अन्त्यासाठी लागणारा निधी
छत्रपती संभाजीनगरः ६०० (निधी ६७.५० कोटी)
जालनाः १६६ (१८.६७ कोटी)
परभणीः १९६ (२२.०५ कोटी)
हिंगोलीः २७ (३ कोटी)
नांदेडः १२२४ (१२७.४६ कोटी)
लातूरः १५ (१.७० कोटी)
धाराशिवः ७८ (८.७७ कोटी)