मुंबई – भारतात उत्सवाच्या काळात घर खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. स्टेट बॅंकेने उत्सव सुरू होण्यापूर्वीच पुढाकार घेऊन गृहकर्जावर बऱ्याच सवलती जाहीर केल्या आहेत. इतर सरकारी आणि खासगी बॅंकाही आगामी काळात अशा प्रकारच्या सवलती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांची मागणी आणि विक्री वाढेल असे बऱ्याच विकासकांना वाटते.
गुरुवारी स्टेट बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यांपर्यंत कमी केले. त्याचबरोबर प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. अशाच प्रकारच्या सवलती इतर सरकारी आणि खासगी बॅंका या आठवड्यापासून जाहीर करण्याची शक्यता आहे. स्टेट बॅंकेने अतिशय योग्य वेळी या सवलती जाहीर केल्या आहेत. इतर बॅंकाही स्टेट बॅंकेच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे एकूणच घर मागणी आणि विक्रीला उठाव मिळण्याची शक्यता असल्याचे हाउसिंग डॉट कॉमचे मुख्य वित्तीय अधिकारी विकास वादवाने यांनी सांगितले. अगोदरच विकसकानी इन्व्हेन्ट्री कमी करण्यासाठी घराच्या किमती कमी केल्या आहेत. त्यातच व्याजदर कमी पातळीवर आहेत. हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
विशेष म्हणजे स्टेट बॅंकेने सर्व रकमाच्या गृहकर्जावरील व्याजदरात सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे किफायतशीर घरापासून लक्झरी घरापर्यंतच्या घराची विक्री वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे आगामी काळात घराच्या किमती वाढणे अपरिहार्य आहे. याची जाणीव ग्राहकांना आलेली आहे. त्यामुळे ग्राहक पुढील काही महिन्यांमध्ये सध्याच्या कमी किमतीवरील घरखरेदीचाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
1.8 लाख घरांची विक्री होणार
गेल्या वर्षी देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. त्याचबरोबर नये घराचे प्रकल्प मंदावले होते. त्यामुळे घर विक्री कमी झाली. त्यावर्षी परिस्थिती थोडीशी सुधारली आहे. त्यामुळे 2021 मध्ये देशातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये किमान 1.8 लाख घरांची विक्री होईल असे अनारॉक या विश्लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. पुण्यासह दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता या शहरातील परिस्थितीचा अभ्यास या संस्थेने केला आहे. 2019 मध्ये या सात शहरांमध्ये दोन लाख 61 हजार घरांची विक्री झाली होती.