नवी दिल्ली – घरांच्या पुरवठ्यापेक्षा घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातील नऊ मोठ्या शहरात विक्री विना पडून असलेल्या घरांची संख्या मार्चअखेर संपलेल्या तिमाहित सात टक्क्यांनी कमी झाली आहे. यात 7 शहरातील घरांची इन्व्हेंटरी 4.81 लाख युनिट एवढी झाली आहे. यामुळे घर बांधणी क्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
विकल्या न गेलेल्या घरामध्ये विकसकांचे भांडवल मोठ्या प्रमाणात अडकून पडते. आता मागणी जास्त असल्यामुळे न विकल्या गेलेल्या घरांची संख्या वेगाने कमी होत आहे. ही माहिती प्रॉप इक्विटी या संस्थेने संकलित केली आहे. डिसेंबर 2023 अखेर संपलेल्या तिमाहीतमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 5.18 लाख युनिट इतकी होती.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई, कोलकत्ता इत्यादी शहरातील आकडेवारीचा अभ्यास करून ही माहिती जारी करण्यात आली. जानेवारी- मार्च 2024 या कालावधीत 1,44,656 घरांची विक्री झाली तर 1,05,134 घरांची निर्मिती झाली. पुण्यातील इन्व्हेंटरी 13 टक्क्यांनी कमी होऊन 65,788 युनिट एवढी झाली आहे. डिसेंबरअखेर ही इन्व्हेंटरी 75,521 इतकी होती.
दरम्यान, आठ महानगरांत यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठ्यात घट नोंदविण्यात आली आहे. पहिल्या तिमाहीत 69 हजार 143 नवीन घरांचा पुरवठा झाला आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत हा पुरवठा 15 टक्क्यांनी कमी आहे.