तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – पोलीस असल्याची बतावणी करून दोन चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील एक लाख ६५ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. २०) दुपारी तळेगाव दाभाडे येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ घडली.
याबाबत एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या तळेगाव दाभाडे येथील बीएसएनएल कार्यालयाजळून दुपारी २.२० वाजताच्या सुमारास पायी चालल्या होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या दोन चोरट्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली.
त्यानंतर फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, हातातील सोन्याची पाटली हे कागदात बांधून बॅगेत ठेवून देतो, असे सांगून हातचलाखी करीत फिर्यादी यांच्या नकळत एक लाख ६५ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक खामगळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.