पिंपरी, (प्रतिनिधी) – आळंदी जवळील कोयाळी गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा घातला. यावेळी सुमारे एक लाख रुपयांचे दारू तयार करण्यासाठी आणलेले रसायन पोलिसांनी नष्ट केले. बुधवारी (दि. २०) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
संजय लक्ष्मण गुडदावत (रा. कोयाळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार गजानन विष्णू आढे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गुडदावत याने कोयाळी गावाच्या हद्दीत हातभट्टी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार बुधवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास पोलिसांनी हातभट्टीवर छापा घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी गुडदावत हा झुडपांमधून पळून गेला. घटनास्थळी दारू तयार करण्यासाठी आणलेले एक लाख रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले.