वाघोली, (प्रतिनिधी)- वाघोलीतील केसनंद फाटा येथून बसने गावी निघालेल्या बाप लेकीची ताटातूट झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ वडिलांचा शोध घेऊन पुन्हा गळाभेट घडवून आणली. दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना पाच वर्षांच्या मुलीची वडिलांसोबत गळाभेट घडवून आणत असताना मुलीच्या चेहर्यावरील आनंद पोलिसांना एक वेगळी ऊर्जा देऊन गेला.
सोमवारी (दि. 12) सायंकाळी लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी स्वप्निल गालफाडे व सागर चौधरी हे केसनंद फाटा येथे वाहतूक नियमन करीत असताना एक पाच वर्षांची लहान मुलगी भर चौकात पायी रडत जात असताना पाहिले.
मुलीला ताब्यात घेऊन महिला कर्मचारी स्नेहल टकले यांनी तिचे रडणे थांबविले. काळजीपूर्वक विचारपूस केल्यावर तिने तिचे नाव सांगून तिचे वडील सापडत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ केसनंद फाटा परिसरात पायी फिरून तिच्या वडिलांचा शोध घेतला. तिच्या वडिलांकडे योग्य ती विचारपूस करून मुलीस वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
स्वस्त तिकिट काढण्यासाठी
गावी जात असताना पुढील भागात स्वस्त तिकीट मिळत असल्याने वडिल तिला एका जागेवर बसवून तिकीट काढण्यासाठी गेले होते. थोड्यावेळाने मुलीला वडील दिसत नसल्याने ती बावरली व वडिलांचा शोध घेत पायी फिरू लागली. वडील मिळत नसल्याने ती रडू लागली आणि केसनंद फाटा येथे पोलिसांना मिळाली.