पुणे – सातत्याने घटती प्रवासी संख्या तसेच ढिसाळ नियोजनामुळे पीएमपीच्या तिकिट उत्पन्नात घट होत आहे. शिवाय, संचलनासाठी निर्मान केलेल्या इतर उत्पन्नाचे पर्यायही सक्षमपणे सांभाळण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. डेपो तसेच पीएमपीच्या इमारतींमधील भाडेकराराने दिलेल्या गाळ्यांची तब्बल 5 कोटी 57 लाखांची थकबाकी असल्याची बाब महापालिकेने केलेल्या लेखा परीक्षणातून समोर आली आहे. भाडेकराराने सुमारे 102 मिळकती दिल्या आहेत. ही थकबाकी 2018-19 या आर्थिक वर्षातील आहे.
पीएमपीच्या डेपो तसेच इतर मिळकतींमधील जागा व्यावसायिक तसेच शासकीय कार्यालयांना दिली आहे. या जागांच्या भाड्यापोटी पीएमपीला 2018-19 या आर्थिक वर्षात 7 कोटी 69 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर 2017-18 मध्ये हेच उत्पन्न सुमारे 10 कोटी 18 लाखांचे होते. त्यामुळे प्रत्येकवर्षी उत्पन्नात 10 टक्के नैसर्गिक वाढ होणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात 2 कोटी 69 लाखांनी भाडे कमी वसूल झाले आहे. त्यामुळे पीएमपीची मिळकतींची थकबाकी सुमारे 5 कोटी 57 लाखांवर गेली आहे. ही वसुली प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे या लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे.
45 गाळ्यांचे भाडेकरार संपुष्टात
पीएमपीकडे सुमारे 102 गाळे आहेत. हे सर्व भाडेकराराने दिले असून त्यातील 45 गाळ्यांचे भाडेकरार मुदत संपुष्टात आली आहे. या मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे सुमारे 3 कोटी 78 लाखांची थकबाकी आहे. तर 12 मिळकतींचा करारानामा न करताच देण्यात आल्या आहेत.