जिल्ह्यातील पाणी तपासणीतून बाब उघड
तत्काळ पाणी स्वच्छ करण्याबाबत सूचना
पुणे – जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या तपासणीमध्ये 19 गावांना पिवळे कार्ड दिले आहे. पिवळे कार्ड म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून मध्यमस्वरुपाचा धोका संभवू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतींना त्रुटी दूर करून हिरवेड कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांबरोबरच पाइपलाइनमध्ये कुठे दुरुस्त्या करण्याच्या आवश्यकता असल्यास तशा ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. पाणी स्त्रोतांच्या स्वच्छता सर्वेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखमीसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तिव्र जोखमीसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. शून्य ते 29 गुणांपर्यंत हिरवे कार्ड, 30 ते 69 गुणांपर्यंत व 70 पेक्षा जास्त गुणांवर लाल कार्ड मिळते.
जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. याचा अर्थ जिल्ह्यात पिण्याचे पाणी पूर्णपणे दुषीत आणि आरोग्यासाठी हानीकारक नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींचे पाणीस्त्रोत पिण्यास योग्य असून, पिवळे कार्ड मिळालेल्या स्त्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे. 19 गावांना पिवळे तर उर्वरित सर्व गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक नऊ गावांना, जूून्नरमधील पाच, वेल्हे दोन तर, मुळशी, पुरंदर, आंबेगाव तालुक्यात प्रत्येक एक गावांना पिवळे कार्ड दिले आहे.