डांगे चौकात वाहतूक कोंडीची समस्या बिकट

ग्रेड सेपरेटरचे काम आणि अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा; उद्या स्वाक्षरी मोहीम

पिंपरी – थेरगाव, डांगे चौक येथे वाहतूक कोंडीची समस्या सध्या चांगलीच बिकट झाली आहे. येथील चौकात ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. त्यातच पथारी व्यावसायिक, फळ आणि भाजी विक्रेते यांनी केलेले अतिक्रमण, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची होणारी पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर येथून चालणे देखील मुश्‍किल होते. त्यामुळे याविरूद्ध आता एका सामाजिक संघटनेतर्फे येथे येत्या रविवारी (दि. 23) सकाळी 9 वाजता जागरूक नागरिक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

डांगे चौक हा थेरगाव येथील मध्यवर्ती आणि वर्दळीचा चौक आहे. सांगवी फाटा ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर हा चौक येतो. या चौकातून रावेत, हिंजवडी, चिंचवडगाव, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी वाहनांची ये-जा सुरू असते. या चौकातून मुंबई-बंगळुरू महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला देखील जाता येते. महापालिकेकडून सध्या चौकामध्ये चिंचवडगाव – हिंजवडी दरम्यान जोडणारा ग्रेडसेपरेटर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे येथील रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक, पथारीधारक आदींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सध्या येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

रविवारी येथील चौकामध्ये आठवडे बाजार भरतो. हा बाजार पूर्वीप्रमाणे डांगे चौकापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे हा बाजार रस्त्याच्या एका बाजूला थेरगाव फाटा ते पंडित पेट्रोल पंपापर्यंत विस्तारला आहे. या बाजारामध्ये तळेगाव, चाकण, मोशी, तळवडे, मामुर्डी, पिरंगुट, आळंदी, सासवड अशा विविध भागांतून विक्रेते येत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. रविवारच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. येथून पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍किल होते.

काय व्हायला हव्या उपाययोजना
ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत आठवडे बाजार अन्यत्र हलवावा
रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अतिक्रमणांना महापालिकेने करावा अटकाव
वाहनांच्या बेशिस्त पार्किंगबाबत वाहतूक पोलिसांनी काढावा तोडगा

थेरगाव – डांगे चौक येथे सध्या ग्रेडसेपेरटरचे सुरू असलेले काम, रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे आणि त्यातच दर रविवारी भरणारा आठवडे बाजार यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे 18 महिन्यांसाठी संबंधित बाजार तात्पुरता बंद करावा. आम्ही याबाबत महापालिका आयुक्त आणि पोलिसांशी पत्रव्यवहार केलेला आहे. याविरूद्ध आम्ही आंदोलनाचे नियोजन केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात येत्या रविवारी (दि. 23) जागरूक नागरिक स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान गणेश मंदिर (गणेशनगर) आणि डांगे चौकातील उड्डाणपुलाखाली ही मोहीम होईल.
– निलेश पिंगळे, थेरगाव सोशल फाउंडेशन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.