देश विकण्याचा डाव हाणून पाडणार – राकेश टिकैत

यूपीतील किसान महापंचायतीला प्रचंड प्रतिसाद

मुज्जफरनगर – संयुक्‍त किसान मोर्चाच्यावतीने आज उत्तरप्रदेशात मुज्जफरनगर येथे किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. त्या किसान महापंचायतीला हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. या वेळी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, हा देश विकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही देशात जागोजागी अशा महापंचायती आयोजित करणार आहोत.

देश उद्योगपतींच्या हातात देण्याच्या सरकारच्या प्रयत्नापासून आज शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना, युवकांना वाचवायचे आहे, त्यासाठी आम्ही व्यापक लढा देणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. या महापंचायतीच्या व्यासपीठावर योगेंद्र यादव, मेधा पाटकर आदि उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला पराभूत करण्याचा निर्धारही या महापंचायतीत करण्यात आला आहे.

उत्त्तर प्रदेशात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या विरोधात वातावरण तापवण्याच्या रणनितीचा भाग म्हणूनही या महापंचायतीकडे बघितले जाते आहे. शेतकऱ्यांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार या आधीही बोलून दाखवला आहे. दरम्यान भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीही शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरूण गांधी यांनी म्हटले आहे की, निदर्शने करणारे हे आमच्याच रक्‍ताचे आहेत. सरकारने त्यांच्याशी पुन्हा चर्चा सुरू करून त्यांच्या प्रश्‍नावर तोडगा काढला पाहिजे.

भारतीय किसान युयिनचे प्रसिद्धी विभाग प्रमुक धर्मेंद्र मलिक यांनी सांगितले की, आजच्या या महापंचायतीत तीनशे संघटनांचे शेतकरी सहभागी झाले असून उत्तरप्रदेश खेरीज हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही यासाठी शेतकरी जमले आहेत. या शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी पाच हजार लंगर लावावी लागली आहेत. यावरून या महापंचायतीच्या व्याप्तीची कल्पना येऊ शकेल.

या किसान महापंचायतीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्याची अनुमती राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागितली होती. पण त्यांना ती अनुमती देण्यात आली नाही. या परिसरात केंद्रीय मंत्री संजीव बालयान आणि भाजपचे आमदार उमेश मलिक यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या ठिकाणीही दक्षतेचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.