बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा शर्मा यांच्या मोटारीत पिस्तूल सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शर्मा यांची गाडी जात असताना त्यांच्या गाडीची डिकी उघडून एक महिला त्यात काही तरी ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवे आरोप प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.
गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेल्या करुणा शर्मा या आज बीड जिल्ह्यातील परळी शहरात आल्या असून त्यांच्या मोटारीत पोलिसांना पिस्तूल सापडले. हे पिस्तूल त्यांचेच आहे का तसेच त्यासाठी त्यांच्याकडे परवाना आहे का? याची पोलीस चौकशी करत होते. दरम्यान, पोलीस गाडीतून त्यांना नेण्यात येत असताना, हा मला अडकवण्याचा कट असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.
परळीमध्ये शर्मा वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवले. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे म्हटलं, मला गावात यायला का अडवता? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे. परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.