रीहोबोथ बीच (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन सुटीनिमित्त मुक्कामाला असलेल्या रीहोबोथ बीचच्या परिसरातील सुरक्षित हवाई हद्दीत एक खासगी विमान चुकून घुसल्यामुळे अध्यक्षांना धोका निर्माण झाला होता. मात्र अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगून खबरदारीचा उपाय म्हणून अध्यक्षांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
बायडेन यांच्याबरोबर फर्स्ट लेडी आणि अन्य कुटुंबीयदेखील होते. अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही धोका नसल्याचे व्हाईट हाऊसने आणि अध्यक्षांच्या सिक्रेट सर्व्हिस विभागाने स्पष्ट केले आहे. परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर अध्यक्ष बायडेन आणि त्यांच्या पत्नी जील बायडेन हे रीहोबोथ बीचकडे रवाना झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बायडेन मुक्कामाला असलेल्या भागातील सुरक्षित हवाई हद्दीमध्ये खासगी विमान चुकून घुसल्यामुळे या विमानाला त्वरित खाली उतरवण्यात आले. या विमानाच्या पायलटची चौकशी करण्यात येणार आहे. हा पायलट सुरक्षेच्या मानक सूचनांचे पालन करत नसल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष वॉशिंग्टनच्या बाहेर जाणार असल्यास आठवडाभर आगोदरच हवाई हद्द सुरक्षित केली जात असते. अध्यक्ष असलेल्या ठिकाणापासून 30 मैल सुरक्षित झोन असतो, तर 10 मैल परिघामध्ये कोणतेही विमान प्रवास करू शकत नाही.