कुआला लांपूर (मलेशिया) – दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एमएच ३७० या विमानाचा पुन्हा शोध घेण्याचे मलेशियाने ठरवले आहे. हिंद महासागराच्या दक्षिणेकडील भागामध्ये हे विमान कोसळले असल्याचा संशय आहे. त्या समुद्रातच आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या विमानाचा शोध घेण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील एका कंपनीने दिला आहे.
ओशन इन्फिनिटी या टेक्सासमधील कंपनीने हा प्रस्ताव दिल्याचे मलेशियाचे परिवहन मंत्री ऍन्थनी लोक यांनी सांगितले. शोधकार्यामध्ये यश आले नाही, तर शोधासाठीचे पैसे मिळणार नाहीत, या बोलीवरच ही कंपनी विमानाचा शोध घेण्यास तयार झाली आहे.
विमानाच्या अस्तित्वाचे पुरावे दिल्यानंतर या शोधासाठीचे कंत्राट मंजूर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोईंग कंपनीचे २३९ प्रवासी असलेले एमएच ३७० हे विमान ८ मार्च २०१४ रोजी कुआला लांपूरवरून बीजिंगला जात असताना अचानक बेपत्ता झाले होते.
या विमानाच्या शोधासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ओशन इन्फिनिटी या कंपनीने २०१८ मध्ये या विमानाता शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या विमानाता शोध थांबवण्यात आला होता.