- चार न्यायाधीश कामावर रुजू ; 30 टक्के कर्मचारीही हजर
पिंपरी – पिंपरी-मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सोमवारपासून रजेवर गेलेले न्यायाधीश वगळता (दि. 14) अन्य 4 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामावर रुजू झाले. त्याशिवाय, 30 टक्के कर्मचारी देखील कामावर हजर झाले. तथापि, करोनाची परिस्थिती लक्षात घेता न्यायालयामध्ये सकाळच्या सत्रातीलच काम चालणार आहे.
मोरवाडी न्यायालयात पूर्वी दोन न्यायाधीशच कामावर हजर होते. मात्र, आता सर्व न्यायाधीश कामावर उपस्थित राहत असल्याने न्यायालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच, कामाची विभागणी झाल्याने त्यांची गर्दी देखील कमी होणार आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन कालावधीत न्यायालये सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर करोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोरवाडीतील न्यायालयात सुरवातीला एकच न्यायाधीश कामावर हजर राहत होते.
मात्र, त्यामुळे संबंधित न्यायाधीशांकडेच विविध कामांसाठी वकील, नागरिक, पक्षकारांची गर्दी होत होती. न्यायालयात एकच न्यायाधीश कार्यरत असल्याने कामाचा पडणारा ताण आणि होणारी गर्दी लक्षात पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना पत्र देण्यात आले. न्यायालयामध्ये आणखी एका न्यायाधीशांना हजर राहण्याबाबत सांगावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली. जिल्हा न्यायालयाच्या सुचनेनुसार, दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देखील आठवडाभरापूर्वी कामावर उपस्थित राहू लागले.
मुंबई उच्च न्यायालयाकडून 10 तारखेला सुधारित कार्यप्रणालीनुसार सुचना जारी करण्यात आली.
त्यानुसार, सर्व न्यायाधीश आणि गट-ब मधील अधिकारी यांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली. तसेच 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबत सूचना केल्या आहेत.
मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात रजेवर असलेले न्यायाधीश वगळता 4 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कामावर हजर झाले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता न्यायालयात सकाळच्या सत्रातीलच काम सुरू राहणार आहे. जामीन अर्ज, आरोपींच्या पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीबाबतचे कामकाज, प्रतिज्ञापत्र, जबाब, मनाई हुकूम, अंतरिम स्थगिती, अत्यंत तातडीची प्रकरणे आदी कामे सुरू राहतील, अशी माहिती पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष दिनकर बारणे यांनी दिली.