स्कूल अँड कॉलेजचे नववे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात : कराटे, मल्लखाबांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित थक्क
चिंबळी -मोरया रे बाप्पा मोरया…. गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी…. जा रे हट नटखट… घुमर रमवा… अशा पारंपरिक गाण्यांसह हिंदी-मराठी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी धरलेला ठेका… पंजाबचा भांगडा ते महाराष्ट्रातील गोंधळापर्यंत विविध राज्यांतील परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवित विद्यार्थ्यांनी या नृत्यप्रकारातून एकतेचा संदेश देत व अंगावर काटा आणणारे कराटे, मल्लखाबांचे प्रात्यक्षिके करीत स्नेहसंमेलनात अनोखा रंग भरला.
निमित्त होते, भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजच्या नवव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. सोमवारी (दि. 30) सकाळी स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष तथा श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे यांच्या हस्ते गणेश प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीताने स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्य अनिता टिळेकर, प्राचार्य विष्णू भद्रे, श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे, बबनराव गवारे, सर्व शिक्षिक, पालक, तसेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी ए मेरे वतन के लोगो… संदेसे आते है… कर चले हम फिदा… ये देश है वीर जवानोंका… या देशभक्तिपर गीतांच्या सादरीकरणातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांच्या आयुष्याचा प्रवास यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवला. यावेळी शालेय अभ्यासक्रम व विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने अध्यक्ष शिवाजी गवारे, विद्या गवारे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कलेची गोडी निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळेला पाहिजे यासाठी श्री समर्थ स्कूल व कॉलेजमध्ये विविध कार्यक्रामांसह उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने त्यांच्या मनातील व्यासपीठाची भीतीही नष्ट होत आहे.
– शिवाजी गवारे, अध्यक्ष, श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज