नगर – भरधाव वेगात जाणाऱ्या टॅंकर खाली चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12.30 च्या दरम्यान पत्रकारचौकात शहर वाहतूक पोलीस चौकीसमोरच घडली.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान नगर शहरातील मार्केट यार्ड येथील अरिहंत सेल्स मशीनरी ऍन्ड हार्डवेअर स्पेअर पार्टस दुकानाचे कमलेश पटवा वय 32, राहणार भुतकरवाडी, हे आपल्या होंडा ऍक्टीवा गाडी नंबर एम एच . 16 -सी बी 9866 या गाडीवरुन सावेडीकडे जात असताना डी एसपी चौकातून भरधाव वेगाने गुंडेगावहून एम आय डी सीत जाणाऱ्या दुधाचा टॅंकर एम एच 16एइ 54 25 या टॅंकरची कमलेश यांना जोरदार धडक बसली.
त्यात त्यांचा तोल गेल्याने ते टेंकरच्या मागील चाकाखाली आले. चाक डोळ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. समोरच असलेल्या वाहतूक शाखेतील कर्मचारी घटनास्थळी धावून आले. या अपघातानंतर पत्रकार चौकात मोठी गर्दी झाली त्यामुळे सर्वच बाजूंनी येणाऱ्या वाहनांची वाहतुक कोंडी झाली. दरम्यान तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये या अपघाता संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत लोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र टॅंकरचा चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.