गोरखपुर – कोणत्याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतात आणि स्वत:वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे ते खंडनही करीत असतात. पण उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एकमेव असे उमेदवार आहेत जे स्वत:ला भ्रष्ट म्हणण्यात धन्यता मानत आहेत.
एवढेच नव्हे तर ते लोकांना असेही आवाहन करताना दिसतात की, आत्तापर्यंत जनतेने इमानदार लोकांना मतदान करून पाहिले पण त्यांचे काहीच कल्याण झाले नाही, यावेळी जनतेने माझ्या सारख्या भ्रष्ट उमेदवाराला मतदान करून पहावे.
हा प्रचार करणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे नाव अरूणकुमार असे आहे. ते गोरखपुर जिल्ह्यातील पिपराईच मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. रोज सकाळी ते सायकलवरून प्रचाराला निघतात. वाटेत जो कोणी भेटतो त्याला ते एका माझ्या सारख्या भ्रष्ट उमेदवाराला मतदान करून पहा असे विचित्र आवाहन करताना दिसतात. लोकांनाही त्यांचे कुतुहल वाटते.
ते त्यांच्याशी सलगी करीत त्यांची नेमकी भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. लोकांवर आपल्या प्रचाराचा चांगला प्रभाव पडतो आहे असा त्यातून त्यांचा समज होतो. सगळ्या इमानदार लोकांनी आजवर काय दिवे लावले, त्यापेक्षा माझ्यासारख्या उमेदवारावर मतदारांनी एकदा भरोसा टाकून पहावा असे त्यांचे लोकांना आवाहन असते. त्यातून लोकांचीही चांगली करमणूक होत आहे.