पुणे – पुणे महापालिकेतर्फे येत्या 27 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना पोलिओ डोस देणे बंधनकारक आहे. या वर्षी ही मोहिम एकाच सत्रात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
महापालिकेतील आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोअर कमिटी आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर, नोडल अधिकारी डॉ. राजेश दिघे, यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण 1 हजार 400 पोलिओ बूथ तयार करण्यात आले आहे. मोहिमेमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील अपेक्षित 3 लाख 11 हजार लाभार्थीना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट असून, पाच दिवस सर्व प्रभागनिहाय हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुध लावण्यात आले आहे, असे डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
“राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत 0 ते 5 वर्ष वायोगटातील बालकांना पोलिओ डोस देऊन ही मोहीम यशस्वी करावी. एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.”
मुरलीधर मोहोळ, महापौर