मुझप्फरनगर – उत्तर प्रदेशात पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला अटक केल्याच्या निषेधार्थ स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील शाहपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कासेरवा गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.
या गावातील कुख्यात गुंड अर्शद उर्फ बांदर याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट लागू करण्यात आले होते. पोलिसांनी या गुंडाला अटक केल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी हिंसक निदर्शने करायला सुरुवात केली आणि पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवून घ्यावे लागले, असे पोलिस उपअधीक्षक विनय गौतम यांनी सांगितले.
अर्शद याच्यावर लूटालूटीसारख्या अनेक प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दगडफेकीच्या संदर्भात पोलिसांनी 25 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.