विठ्ठल लांडगे
नगर -लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपात दाखल झालेल्या विखे पाटील पिता-पुत्रांशी मूळ भाजप अजूनही जुळवून घेण्याच्या मानसिकेत नसल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळे विखे पिता-पुत्र अजूनही पक्षात एकाकीच असल्याचे दिसते. पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने केलेली खोचक टीका आज खूप चर्चेचा विषय ठरली. त्यातून हा संघर्ष आणखी गडद होईल, अशीच चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात विखे पिता-पुत्रांविरुद्ध थेट तक्रार केली होती. माजी मंत्री प्रा. राम शिंदे व शिवाजी कर्डिले यांनी जाहीरपणे केलेली टीका राज्याच्या राजकारणात चर्चेची ठरली होती.
तथापि, अलीकडे पक्षात दिलजमाई झाल्याचे चित्र रंगविण्यात येत होते. खासदार डॉ. विखे पाटील यांनी अलीकडेच माजी मंत्री कर्डिले यांची भेट घेतल्याने हा वाद शमल्याचे मानले जात होते. मात्र, काल नगरमध्ये महापौरांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्याच शहर-जिल्हाध्यक्षांनी खासदार विखे पाटील यांची खिल्ली उडविली. त्यामुळे पक्षात काहीच अलबेल नसल्याचे उघड झाले अन् हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
खासदार विखे पाटील यांना महापालिकेतील “नॉलेज’ नाही, अशा शब्दांत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे महापालिकेतील नगरसेवक गंधे यांनी खिल्ली उडविली. महापौर व पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती उडविली गेल्याने अन्य कोणत्याही पदाधिकारी किंवा नगरसेवकाचे विखे पाटील यांचे सूत जुळलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्र अजूनही पक्षात एकाकी असल्याचेच चित्र आहे.
भाजपच्या खासदारांसोबत कॉंग्रेसचे पक्षाचे नगरसेवक…!
विखे पाटील पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते आहेत. कॉंग्रेसमध्ये त्यांना मानणारा मोठा ग्रुप होता. त्यातील बहुतेक कार्यकर्ते आजही विखे पाटील यांचेच चाहते आहेत. नगर महापालिकेतील कॉंग्रेसचे काही नगरसेवक उघडपणे विखे पाटील यांच्यासोबत असतात. नेमकी हीच बाब भाजपचे नगरसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांना रुचत नाही. त्यात महापालिकेत येताना खासदार डॉ. विखे पाटील यांच्या यंत्रणेकडून निरोप मिळत नसल्याचीही कुरबूर पक्षाचे नगरसेवक करतात. त्यामुळे विखे पाटील यांची कॉंग्रेसच्या नगरसेवकांशी असलेली जवळीक भाजपच्या नेत्यांना खटकते.