विरोधी पक्षांची मुख्यसभेत मागणी; तीन महिन्यांनंतर झाली सभा
पुणे – करोना काळात केलेल्या आरोग्यावरील खर्चाचा हिशेब द्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी बुधवारी महापालिका मुख्य सभेत केली. तसेच करोना उपाययोजना या विषयावर आम्हांला बोलायचे आहे, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली मात्र संसर्गाच्या शक्यतेचे कारण देत महापौरांनी सभा तहकूब केली.
सलग तीन महिने महापालिकेची मुख्य सभा न झाल्यास सदस्यत्त्व जाते. त्यामुळे महापालिकेने बुधवारी मुख्यसभा भरवली. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षांनी करोना काळात उपचारावर केलेल्या 125 कोटी रुपये खर्चाचा तपशील मागितला. तसेच आतापर्यंतच्या आणि सध्या करत असलेल्या उपाययोजना आणि पुढे काय करणार, यांचा तपशील सदस्यांनी आयुक्तांकडे मागितला. या विषयावर चर्चा घडवून आणा आम्हाला बोलायचे आहे, अशी मागणी कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि दिलीप बराटे यांनी केली.
‘करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. एवढ्या दिवसांनी मुख्यसभा होत आहे तर आयुक्त का उपस्थित नाहीत,’ असा प्रश्न विशाल तांबे यांनी उपस्थित केला. “स्वॅब किट नसल्याने लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांना तपासणी अभावी पुन्हा घरी पाठवले जात आहे,’ अशी तक्रार प्रशांत जगताप यांनी केली. तर उपाययोजनांबाबतच अहवाल मुख्यसभेपुढे ठेवा, अशी मागणी दत्तात्रय धनकवडे यांनी केली. यातच सभागृहनेते धीरज घाटे यांनी सभा तहकुबी मांडली. त्यावरून अधिकच गोंधळ झाला.
‘हिशेब नको पण निदान उपाययोजनांवर तरी बोलू, त्यांच्याकडून आम्हांला माहिती हवी आहे,’ अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत सभा तहकुबी मांडण्यात आली. विरोधी पक्षांनी तहकुबीला विरोध केला. महापौरांनी त्यावर नगरसचिवांना मतदान घेण्यास सांगितले. 60 विरुद्ध 34 अशा मतांनी ही तहकुबी मंजूर करण्यात आली.
महापौर म्हणाले…
“मुख्य सभेला आपण 100 पेक्षा जास्त सदस्य येथे जमा झालो आहोत. याशिवाय येथे सेंट्रल एसीही सुरू आहे. आपण आपल्या मतदारसंघात रोज फिरत आहोत, कामे करत आहोत. येथे संक्रमणासारखी घटना घडली, तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ती काळजी आपण घेतली आहे,’ असे महापौरांनी सभा तहकुबीचे कारण सांगितले. तर, “आपण सगळी माहिती देण्यासाठी पक्षनेत्यांची या आधीही बैठक घेतली आहे, यापुढेही घेण्यात येईल. तरीही, ज्यांना जी माहिती हवी आहे, ती क्षेत्रीय कार्यालयामार्फत देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश महापौरांनी आयुक्त आल्यावर त्यांना दिले.
‘फिजिकल डिस्टन्सिंग’
सभागृहात एका सोफ्यावर तीन सदस्यांना बसण्याची सोय आहे मात्र, बुधवारी एका सोफ्यावर एक सदस्य अशी सोय करण्यात आली होती. तसेच महापौरांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत खुर्च्यांची सोय करण्यात आली. त्यामुळेही तेथेही काही सदस्य बसले. याशिवाय सभागृहात येण्याआधी सदस्याचे सॅनिटायझेशनसह स्क्रीनिंगही करण्यात आले. सदस्य एकमेकांपासून अंतर ठेवूनच बसले होते.