पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष मतदार नोंदणी शिबिरात एकूण १०३ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तृतीयपंथी मतदार यांची मतदार नोंदणी वाढविण्याच्या अनुषंगाने समाज कल्याणच्या सहायक आयुक्त यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी वाढवण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संगमवाडी कॉर्नर, येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बुधवार पेठ येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची एकूण १० पथकांनी सहभाग घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील तृतीयपंथी मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मतदार नाव नोंदणी करण्याची मोहिम राबविण्यात आली. मतदार नोंदणी शिबिरे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वीप समन्वयक उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पुण्यातील युवक विकास आणि उपक्रम केंद्र व पुणेरी प्राईड फाऊंडेशन या सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ डिसेंबरपर्यंत सूरू राहणार असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांनी समाज कल्याणच्या सहायक आयुक्त कार्यालय, येरवडा या कार्यालयाशी संपर्क करून जास्तीत जास्त मतदार नाव नोंदणी करावी, असे आवाहन पुणे जिल्हा समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.