पावसामुळे मोठे नुकसान
इजिप्तच्या कांद्याला मिळतोय 45 रु. भाव
पुणे – कांद्याने पुन्हा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. जुना कांद्याचा मर्यादित साठा, पावसामुळे नवीन कांद्याचे झालेले नुकसान…यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या भावात तेजी आली आहे. घाऊक बाजारात रविवारी कांद्याला किलोस 40 ते 60 रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात प्रति किलो कांदा 70 ते 80 रुपये भावाने विक्री केली जात आहे.
राज्यातील बहुतांश भागातील अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा भिजलेला आहे. बाजारात दाखल होणाऱ्या कांद्याचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे.
मागील आठवड्यात कांद्याचे प्रति दहा किलोचे भाव 300 ते 400 रूपये होते. ते आज वाढले. मार्केटयार्डात रविवारी नाशिक, संगमनेर, कोपरगाव, वडणेर, निघोज, नगर आदी भागांतून सुमारे 130 ते 150 ट्रक कांद्याची आवक झाली.
“मार्केटयार्डात मुंबईमार्गे इजिप्तच्या कांद्याची काही प्रमाणात आवक होत आहे. या कांद्यास कॅन्टिन, हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी जास्त आहे. स्थानिक ग्राहक या कांद्याच्या खरेदीला प्राधान्य देत नाहीत.
या कांद्यास घाऊक बाजारात किलोस 40 ते 45 रुपये भाव मिळत आहे,’ अशी माहिती मार्केटयार्डातील कांद्याचे आडते गणेश यादव यांनी दिली. ते म्हणाले, “यंदा देशासह राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वी दोन-तीन महिने लागवड केलेला कांदा बाजारात दाखल होत आहे. मात्र, तो पावसात भिजलेला असून त्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांतून कांद्याला जास्त मागणी आहे. त्या तुलनेत बाजारात आवक होत नसल्याने भावात वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास महिनाभरानंतर कांद्याची आवक वाढून भाव आटोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस पडत राहिल्यास पुढील काही महिने तरी कांद्याचे भाव तेजीत राहतील,’ असा अंदाजही त्यांनी वर्तविला.
…म्हणून वाढत आहेत भाव
याबाबत किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घाऊक बाजारात कांद्यास किलोस 40 ते 60 रुपये भाव मिळत असला, तरी खरेदीदारांना कांदा खरेदीवेळी हमाली, आडत, सेस द्यावा लागतो. त्यामुळे खरेदीदारांना एक किलो कांदा प्रतवारीनुसार 45 ते 65 रुपयांना मिळतो. त्यातून वाहतूक, दुकानभाडे याचा विचार करता किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याचा विक्री दर 70 ते 80 रुपयांवर पोहचला आहे.