हणबरवाडी येथे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेत बाल स्पर्धकांनी घेतला सहभाग
सातारा (प्रतिनिधी) – दिवाळीचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे व सिद्धनाथ शेडगे यांच्यावतीने हणबरवाडी (मसूर) या ठिकाणी आयोजित भव्य किल्ले स्पर्धेत अनेक बाल स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी दारोदारी प्रतापगड, रायगड, राजगड, नळदुर्ग, सिंधुदुर्ग, पन्हाळा असे विविध किल्ले उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा दिला.
किल्ले स्पर्धेत किल्ला शिवकालीन असावा. किल्याची माहिती दिशादर्शक, इतिहासाची माहिती असावी, असे नियम व अटी होत्या. स्पर्धकांनी सुरेख असे किल्ले बनवून शिवकालीन गडकोटांना उजाळा दिला. दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा शिवरायांच्या पराक्रमाची भूमी आहे. महाराष्ट्रातील तसेच साताऱ्यातील गडकोट प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हाच छत्रपतींचा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीने जपून तो टिकवला पाहिजे. या किल्ले स्पर्धेतून शिवकालीन गडकोटांना उजाळा मिळावा हाच आमचा उद्देश होता. अशा उपक्रमांतून आपल्या इतिहासाला नवसंजीवनी मिळणारी आहे.
भैरवनाथ केसरी तसेच सातारा पोलिसमध्ये कार्यरत असलेले सिद्धनाथ शेडगे म्हणाले, सध्याच्या युगात लहान मुले मोबाइल गेम आणि टीव्हीच्या जाळ्यात अडकली असताना त्यांना आपल्या शूरवीरांची आणि देदीप्यमान इतिहासाची माहिती स्मरणात राहून त्यांनी यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून हा आम्ही उपक्रम राबवला होता.
या स्पर्धेत यशराज दबडे, समाधान पवार, श्रेयश कदम, प्रथमेश पवार, वेदांत ढेरे, स्वराज पवार, पार्थ पवार, सोहम शेडगे, साहिल शेडगे, आदित्य शेडगे सर्वेश शेडगे, देवराज शेडगे अशा अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी किल्याचे परीक्षण लता शेडगे, गोरखनाथ शेडगे, अरुण शेडगे, गजानन शेडगे, किशन शेडगे, विजय फडतरे, अक्षय शेडगे, विजय शेडगे आदींनी केले. लवकरच या स्पर्धकांना शाल श्रीफळ, रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून यांचा सन्मान केला केला जाणार आहे. दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे व सिद्धनाथ शेडगे यांच्यावतीने राबवण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचे हणबरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले.