वाघोली : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. असाच उपक्रम वाघोली येथील सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्सच्या वतीने ‘दो धागे श्रध्दा के’ राबवित प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र आणि माता सीतेसाठी साडी विणण्यात आली. वस्त्रांची विधीवत पूजा अर्चना करून अयोध्येकडे रवाना करण्यात आली. पुणेकरांच्या सहभागातून हे वस्त्र विणण्यात आले आहे.
‘दो धागे श्रध्दा के’ हा उपक्रम ६ ते १५ जानेवारी दरम्यान राबवून हे वस्त्र विणण्यात आले होते. त्यासाठी हातमाग कारागिर देखील ठेवण्यात आले होते. तसेच पुणेकरांना रामलल्लांसाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी ही यावेळी उपलब्ध करुन दिली होती. या उपक्रमात सर्वात जास्त वाघोली व आसपासच्या महिलांचा सहभाग दिसून आला. सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ पर्यंत क्लॉथ स्टोअर्स मध्ये येऊ वस्त्र विणले गेले.
“वाघोली मधील अनेक महिलांना रामलल्लांसाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी मिळाली आहे.हे मोठे भाग्य आहे.दो धागे श्रध्दा के’ या उपक्रमातून श्रद्धा, भावना, आणि समर्पण या मूल्यांचा अनमोल संदेश मिळाला.” – जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच, वाघोली.