वाघोली – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत हवेली तालुक्यातील रा.मा.६८, भाग वाघोली ते लोहगाव एच.पी.पेट्रोल पंपापासुन ते वाघेश्वर मंदिराजवळील अभिषेक लॉन्स पर्यंत रस्त्याच्या सुधारणा कामाचा भूमिपूजन समारंभ शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यासाठी ३ कोटी ३५ लाख ५९ हजार १०८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाघोली लोहगाव रस्त्यावर पावसामुळे पडणारे खड्डे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना कायमस्वरूपी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. नागरिकांनी स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते. वाघोलीचे आजी माजी पदाधिकारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून ३ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“वाघोली लोहगाव रस्त्यासाठी स्वखर्चाने अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्यासाठी भरीव निधीची गरज होती. पीएमआरडीएच्या वतीने हा निधी मंजूर केल्याने वाघोली लोहगाव रस्त्याने ये जा करणाऱ्यांचा मार्ग सुकर होणार आहे,” असे वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील म्हणाल्या.
“या कामामुळे वाघोली परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच दळणवळण अधिक सुकर आणि सुलभ होईल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील म्हणाले.