- खंडाळा महामार्गच्या सहायक पोलीस निरीक्षक सुमैया बागवान यांची माहिती
लोणावळा – येत्या गुरुवारी म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक लोणावळा ते खंडाळा दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती खंडाळा महामार्गच्या सहायक पोलीस निरीक्षक सुमैया बागवान यांनी दिली.
खंडाळा येथील बॅटरी हील याठिकाणी एक ट्रेलर बॅटरी हील येथील नागरी वस्तीत पडला आहे. हा ट्रेलर बाहेर काढण्यासाठी या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे.
दरम्यानच्या कालावधीत लोणावळा येथून जुन्या मार्गाने पुणे-मुंबई लेन आणि बोरघाट येथून मुंबई-पुणे लेन अशी दोन्ही बाजुची वाहतूक “एक्सप्रेस वे’ने वळविण्यात येईल.
तसेच ट्रेलर काढण्याचे काम चालू असताना 10 मिनिटाचा “ब्रेक’ घेवुन काम थांबवून थांबवलेली वाहतूक सोडण्यात येतील. याची सर्व वाहतुकदार, पर्यटक, प्रवासी, दुचाकीस्वार, तीन चाकीस्वार यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बागवान यांनी केले आहे.