नवी दिल्ली – अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था कायम मंगळावरील सृष्टीचा वेध घेण्यासाठी कार्यरत असते. त्यासाठी तिथल्या जमिनीवर चालू शकतील अशा बग्गी पाठवण्याचे प्रयोग नासाने यापूर्वी देखील केले आहेत. आता या मालिकेतील प्रिझर्व्हरन्स नावाची एखाद्या मोटारीच्या आकाराएवढी बग्गी मंगळावर पाठवण्यात आली असून सध्या तिचा मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रवास चालू आहे. ती दहा फूट लांब, सात फूट उंच आणि नऊ फूट रुंद आहे. तिचे वजन 1050 किलो एवढे आहे.
साधारणपणे 95 टक्के प्रवास तिने पूर्ण केला असून 18 फेब्रुवारी रोजी ती मंगळावर उतरणार आहे. तिचा मंगळावर उतरण्याचा टप्पा अतिशय रोमांचक आणि रंजक असणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण त्या दिवशी नासा टीव्हीवरून करण्यात येणार आहे. ही बग्गी मंगळावरील जेझीरो क्रॅटर असे नामकरण केलेल्या ठिकाणी उतरणार आहे. 18 फेब्रवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही बग्गी मंगळावर उतरेल. 30 जुलै 2020 रोजी या बग्गीसह यानाने अमेरिकेतून उड्डाण केले आहे.
सहा चाकांची ही बग्गी मोठ्या हिट शिल्डद्वारे उतरवण्यात येणार आहे. उतरताना तिचा वेग ताशी सुमारे 20,000 किलोमीटर इतका असेल. हवाई छत्री उघडल्यानंतर हा वेग खूपच कमी म्हणजे ताशी पाऊण किलोमीटर अतका कमी होईल. त्यानंतर मोठ्या स्काय क्रेनद्वारे ही सहा चाकी बग्गी मंगळावर उतरवण्यात येईल. मंगळावर कोणतीही गोष्ट उतरवणे ही अतिशय आव्हानात्मक बाब असते. आतापर्यंत विविध अंतराळ संशोधन संस्थांनी पाठवलेल्यापैकी 40 टक्के संस्थांनाच लँडिंगमध्ये यश
मिळालेले आहे. प्रिझर्व्हरन्स हा नासाचा मंगळावर उतरण्याचा पाचवा प्रयत्न आहे. प्राचीन काळात मंगळावर जीवसृष्टी होती, त्याच्या काही खाणाखुणा आढळतात का याचा अभ्यास या बग्गीद्वारे केला जाणार आहे. त्यासाठी ही बग्गी तिथेली काही खडक आणि मातीचे नमुने घेऊन परत पृथ्वीवर येणार आहे. नासाच्या या सगळ्या मोहिमेतून भविष्यातील रोबोटिक तंत्रज्ञानाचे आणि मानवी प्रयत्नांचे दर्शन घडणार
आहे. या बग्गीला घेऊन जाणारे यान सूर्याच्या सापेक्ष विचार करता ताशी 48,964 मैल वेगाने प्रवास करत आहे. आतापर्यंत या यानाने सुमारे 273,200,000 एवढ्या मैलांचा प्रवास केला आहे. आता ती मंगळापासून सुमारे 18,000,000 किलोमीटर अंतरावर आहे.