राजगुरूनगर -कडूस (ता. खेड) येथे आणखी एका सहा वर्षांच्या मुलीचा अहवाल रविवारी (दि. 31मे) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कडूस गावातील करोनाबाधितांची संख्या 4 झाली आहे तर तालुक्यातीची संख्या 24वर पोहोचली असून यातील 5 जण करोनामुक्त झाले असून 19 जणांवर उपचार सुरू आहेत.
खेड तालुक्यातील 12 गावांमध्ये आतापर्यंत करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील एक गाव करोनामुक्त झाले असून 11 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन करून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत आढळून आलेल्या 24 बाधितांपैकी बहुतांशी व्यक्ती मुंबईवरून आलेल्या आहेत.
खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे म्हणाले की, तालुक्यातील 14 संशयितांच्या स्वॅबचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. त्यापैकी 1 पॉझिटिव्ह तर 12 निगेटिव्ह आले आहेत. कडूस (2), पाईट (3), कुरकुंडी (4), चाकण (1), राजगुरूनगर (1), वडगाव घेनंद (1) यागावांतील 13 संशयित निगिटिव्ह आले आहेत.
वाडा येथे शनिवारी (दि. 30 मे) 55 वर्षीय महिला मुंबई वरून मुलानसोबात गावी आली होती. काहीं दिवसांपूर्वी मुंबईमध्ये त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांचा दशक्रीयाविधी सोमवारी (दि. 1) वाडा येथे होणार होता. मात्र, या महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या घोडेगाव येथील रुग्णालयात गेल्या मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्यावर रविवारी (दि. 31 मे) वाडा येथे अंत्यविधी करण्यात आला. या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना सतर्कता म्हणून विलगिकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे.
खेड तालुक्यातील करोनाबाधित गावे व संख्या
राक्षेवाडी : 5 सर्वजण बरे होऊन घरी, वडगाव न खेड : 2, कुरकुंडी : 3, पाईट : 1, पापळवाडी : 4, बुरसेवाडी : 1, वेताळे : 1, वाशेरे : 1, वाजवणे : 1, चाकण : 1, कडूस : 4, एकूण : 24