वॉशिंग्टन : एकीकडे अमेरिकेत कोरोनाने थैमान घातला आहे. तर दुसरीकडे अमेरिकत सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर सुरु झालेल्या हिंसाचाराची झळ व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या सुरक्षेला धोका नव्हता असे अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सीसह अमेरिकेच्या 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी खास सुरक्षेसाठी बंकरची स्थापना केली आहे, जसे की एखादा दहशतवादी हल्ल्याची घटना घडली तर त्याठिकाणी सुरक्षित राहता येईल. आता आंदोलनामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं बंकरमध्ये जाणं या मुद्द्याचा वापर विरोधक शस्त्र म्हणून करायला लागले आहेत.
अमेरिकेच्या मिनेपॉलिसमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा या कृष्णवर्णीय व्यक्तीला पकडले होते, तेव्हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर मिनेपॉलिसमध्ये हिंसाचार उफाळला आणि तो अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये पसरला.
वॉशिंग्टनमध्ये आंदोलक मोठ्या संख्येने व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळा होऊन घोषणाबाजी करु लागले. आंदोलकांनी पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पोलिसांवर फेकल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे गोळे फेकले. तर आंदोलकांनी व्हाईट हाऊसजवळ असलेल्या गाड्यांला आग लावली. पोलीस आणि विशेष सेवेच्या अधिकारी या गाड्यांचा वापर करतात. पोलिसांनी आतापर्यंत संपूर्ण अमेरिकेतून 1400 आंदोलकांना अटक केली आहे.