जुन्नर -जुन्नर तालुक्यात करोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी (दि. 28) दिवसभरात आंबेगव्हाण (2), मांजरवाडी (1) आणि धालेवाडी तर्फे मिन्हेर (1) येथील एकूण चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण 16 ऍक्टिव्ह करोनाबाधित रुग्ण झाले आहे. तालुक्यातील जवसपास सर्वच करोनाबाधित रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत.
जुन्नर परिसरातील गावांमधील वाढता करोनासंसर्ग पाहता जुन्नर शहर कापड असोसिएशनने सर्व दुकाने पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष तेजस मेहता व सचिन गिरी यांनी दिली आहे. तसेच फोटोग्राफर असोसिएशननेही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.
दरम्यान, लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सावरगाव, खिल्लारवाडी, मांजरवाडी, धोलवड, पारुंडे आणि धालेवाडी तर्फे मिन्हेर या करोनाबाधित गावांचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.