शिमला: हिमाचल प्रदेशमध्ये करोनाच्या संकटात पीपीई किट घोटाळा प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी राजीनामा दिला आहे. या घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेत राजीनामा असल्याचे राजीव बिंदल यांनी म्हटले आहे.
करोना विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात एक 43 सेकंदाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
यात आरोग्य संचालक डॉ. अजयकुमार गुप्ता हे पीपीई पुरवठादाराकडे 5 लाख रुपयांची लाच मागत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी गुप्ता यांना 20 मे रोजी अटक करण्यात आली आहे. यात बिंदल यांचाही सहभाग असल्याचा आणि भाजप अध्यक्ष बिंदल यांनी टेंडर दिले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. त्यामुळे बिंदल यांनी आपला राजीनामा जे. पी. नड्डा यांना पाठविला आहे. बिंदल यांची साडेचार महिन्यांपूर्वीच भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
या क्लिपमध्ये करोडो रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजप नेत्यांची नावे घेतली जात होती. यामुळे राजीव बिंदल यांनी नड्डा यांना पाठविलेल्या राजीनाम्यामध्ये याचे कारण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश सरकारने त्याविरोधात कारवाई केली आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष कुलदीप सिंह राठौर आणि विधिमंडळ गटनेते मुकेश अग्निहोत्री यांनी करोना व्हायरसच्या या महामारीत हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागात झालेल्या या भ्रष्टाचाराच्या पापातून भाजप सुटू शकत नाही, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर देखील याप्रकरणी जबाबदार आहेत. कारण आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.