नवीन 629 रुग्णांची भर : मंगळवारी 16 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 24 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत शहरात 24,311 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूण 505 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 408 तर शहराबाहेरील व परंतु शहरात उपचार घेतलेल्या 97 रुग्णांचा समावेश आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज 629 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी शहरातील 629 जणांना करोनाची लागण झाली. तर गेल्या तीन दिवसांपासून शहराबाहेरील एकाही रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 24,311 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 4099 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 316 रुग्णांचाही समावेश आहे.
मंगळवारी दिवसभरात 16 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 13 तर शहराबाहेरील 3 रुग्णांचा बळी गेला. शहरातील आकुर्डी, चिंचवड, निगडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, किवळे, भोसरी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, इंद्रायणीनगर, मोशी, सांगवी येथील 13 रुग्णांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील तळेगाव दाभाडे, देहूरोड व म्हाळुंगे येथील 3 रुग्णांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
डिस्चार्जची संख्या बाधितांपेक्षा अधिक
आज दिवसभरात 900 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. गेले काही दिवस नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ही डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांपेक्षा खूप अधिक होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून डिस्चार्ज वाढले आहेत आणि नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसत आहे. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 17,106 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 929 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 1520 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान आज दिवसभरात 23,481 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे 77,245 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 3786 जणांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.