वॉशिंग्टन – जगभरातील करोनाबाधितांची संख्या आता अडीच कोटींवर पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापिठाने केलेल्या नोंदीच्या आधारे ही आकडेवारी देण्यात आली आहे.
या आकडेवारीमध्ये अमेरिकेचा क्रमांक अजूनही पहिला आहे. अमेरिकेतल्या करोनाबाधितांची संख्या 59 लाखांच्या घरात आहे. त्यापाठोपाठ ब्राझिलमध्ये 38 लाख आणि तिसऱ्या क्रमांकावर 35 लाख करोनाबाधितांच्या भारताचा क्रमांक लागला आहे.
मात्र रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार जगभरात विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या या आकडेवारीपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे मानले जात आहे. विशेषतः अमेरिकेतील करोनाबाधितांची संख्या कदाचित 10 पट जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चाचण्यांवरील मर्यादा, कित्येक सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद न झाल्यामुळे ही संख्या वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जागतिक पातळीवर कोविड-19 रुग्णांच्या मृत्यूची संख्या 8 लाख 42 हजारांच्या पुढे आहे.
अमेरिकेमध्ये सर्वाधिक 1 लाख 82 हजार 779 रुग्णांचा मृत्यू झला आहे. त्यापाठोपाठ ब्राझिलमध्ये 1 लाख 20 हजार 262 आणि मेक्सिकोमध्ये 63 हजार 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.