विसर्जन मिरवणुका काढाल तर, खबरदार – पुणे पोलीस

गणेश विसर्जनानिमित्त सात हजार पोलीस तैनात

पुणे- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन मिरवणूक आणि घाटावर विसर्जनास बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून व सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी शहरात सात हजार पोलीस रस्त्यावर तैनात राहणार आहेत. त्यामध्ये शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य राखीव पोलीस बल तैनात असेल. विसर्जन घाट, मानाचे गणपती परिसरात जास्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

करोनामुळे यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. पोलीस व महानगरपालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन सोसायटीतच करून सहकार्य केले आहे. घरगुती श्रींची संख्या तब्बल 4 लाख 73 हजार 800 इतकी आहे. मात्र नागरिकांनी सहकार्य केल्याने विसर्जन घाटावर एकाही मूर्तीचे विसर्जन झाले नाही.

तसेच गणपती मंडळदेखील मंडपातील हौदाच गणपतीचे विसर्जन करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. निर्धारित केलेल्या नियमानुसार कोणालाही विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी राहणार नाही. तर मंडपातील हौदात विसर्जन करताना फक्त मंडळाचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यावेळी त्यांना सुरक्षित अंतराचे नियम पाळावे लागतील.

मानाच्या गणपतीच्या विसर्जनाला गर्दी होण्याची शक्यता वाटली, तर शिवाजी रस्त्यावरील वाहतूक देखील काही वेळ वळवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुका नसल्यामुळे मुख्य मिरवणूक मार्गावरील चार रस्त्यांवर यंदा बंदोबस्त राहणार नाही.

 

रात्री 11 वाजेपर्यंत होणार सर्व मूर्तींचे विसर्जन

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक 24 तासांपेक्षा अधिक वेळ चालते. मात्र, यंदा विसर्जन मिरवणुकींना बंदी आहे. त्यामुळे मंडपातच श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात होईल. रात्री अकरापर्यंत शहरातील गणपतीचे विसर्जन झालेले असेल. त्यामुळे पहिल्यांदाच विसर्जन लवकर झाल्यामुळे पोलिसांना बंदोबस्त कमी करावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.