दोन-तीन दिवसांनंतर जाहीर होणार निवड : इच्छुकांनी दिल्या मुलाखती
अकोले – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकारी येत्या दोन-तीन दिवसांनंतर जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास 31 जण या पदासाठी इच्छुक असल्याचे उघड झाले. राजूर येथे सोमवारी अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदासह कार्यकारिणीच्या निवडीसाठी शासकीय विश्रामगृहावर इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.
निरीक्षक म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अजित कदम हे उपस्थित होते. ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांनी या मुलाखती घेतल्या. तालुकाध्यक्ष पदासाठी निवृत्त गटविकास अधिकारी भानुदास तिकांडे, प्राचार्य संपतराव नाईकवाडी, प्राचार्य सुरेश खांडगे, संदीप वाकचौरे, प्रा. चंद्रभान नवले, व्यावसायिक पोपट दराडे यांच्यासह अनेकांची नावे अग्रस्थानी होती.
मुलाखत प्रक्रिया सोमवारी झाली असली, तरी कोण होणार तालुकाध्यक्ष हे दोन-तीन दिवसांनंतर जाहीर होणार असल्याचे कार्याध्यक्ष वर्पे यांनी सांगितले.
मुलाखतीस सुरुवात होण्यापूर्वी तेथे कार्यकर्त्यांसमवेत बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते अशोक भांगरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कार्यकारिणी जाहीर करणे बाकी होते. गेली 40 वर्षे ज्यांनी तालुक्यात वर्चस्व गाजविले त्यांना आम्ही पराभूत करू शकलो.
मात्र आमदारकीत विजय मिळवून देखील मंत्रिपद आणि पंचायत समिती राखण्यात अपयश आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर ठराव करुन संघटन बांधले पाहिजे. वरिष्ठांनी लवकर कार्यकारिणी जाहीर करावी. यात कोणी नाराज होऊ नये. आमदार लहामटे म्हणाले, इच्छुकांच्या मुलाखती न घेता त्यांचे विचार ऐकून घेतले जाणार आहेत. पक्षाचा आदेश कोणी डावलू नका.
सोशल मीडियाचा वापर करुन पक्षाची बदनामी करु नका. कदम म्हणाले, तुमचा शत्रू फार मोठा आहे. त्यामुळे तुमचे वाद चव्हाट्यावर आणू नका. चार भिंतीच्या आत वाद मिटवा.जिल्हा कार्याध्यक्ष वर्पे म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. स्थानिक स्वराज्या संस्थासाठी आता एकजुटीने कामाला लागले पाहिजे. निवड प्रक्रिया पक्षाच्या आचारसंहितेनुसार होणार असून, निवड होणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे कार्य वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचवावे.
पक्षसंघटनेसाठी काम करणार ः अमित भांगरे
पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पडणार आहोत. पक्ष संघटनेसाठी कायम काम करत राहणार असल्याचे युवा नेते अमित भांगरे यांनी सांगितले. आपण जिल्हा उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी सांगितले.