पोलिसांनी प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला

आत्महत्येपासून परावृत्त करण्यात पोलिसाना यश


चिमुकलीच्या हस्ते पोलीस आयुक्तांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांना सलाम

पुणे – कौटुंबिक कारणामुळे एक महिला आत्महत्येसाठी नदीकडे जात असल्याची माहिती एका व्हॉटसऍप ग्रुपच्या ऍडमिन महिलेने पोलीस नियंत्रण कक्षास दिली. पोलिसांनी क्षणार्धात वायरलेसद्वारे खडकी, चतुःशृंगी, विश्रांतवाडी पोलिसांना संदेश पाठवला. एका कर्मचाऱ्यास ती महिला दिसली. त्याने तिला तातडीने चौकीला आणून तिची समजूत काढून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांनी तातडीने उचललेल्या पावलांमुळे महिलेचा जीव वाचला. पोलिसांच्या कामगिरीची दखल घेऊन एका सामाजिक संस्थेने पोलीस आयुक्तांचा एका चिमुकलीच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांना सलाम केला. पाच वर्षांच्या मिशिकाने पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांना “थॅंक्‍यु सर’ म्हणत त्यांचे आभार मानले.

क्रिएटीव्ह ग्रुपच्या प्राची दासवाणी यांचा एका व्हॉटसऍप ग्रुप आहे. त्यांना या ग्रुपवर एका महिलेचा आत्महत्या करायला जात असल्याचा मेसेज आला होता. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षामध्ये 31 जानेवारीला रात्री फोन केला. त्यांनी एक महिला औंध परिसरात आत्महत्येसाठी जात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर वायरलेस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एच. एम. सोनवणे व पोलीस हवालदार धर्मराज मोहिते यांनी ही माहिती चतुःशृंगी पोलिसांना दिली. त्यानंतर औंध पोलिसांनी पाहणी करून संबंधित महिला आढळली नसल्याचे नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर पोलीस कर्मचारी राजू मोहिते यांनी त्याविषयी खडकी, विश्रांतवाडी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, खडकी पोलीस ठाण्याच्या मरिआई पोलीस चौकीच्या बीट मार्शलने होळकर पुलाच्या दिशेने जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना ती महिला आढळली. त्यानंतर खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक ज्ञानदेव आबनावे, पोलीस शिपाई साईनाथ म्हस्के यांनी महिलेची समजूत काढली. तिला आत्महत्येपासून परावृत्त करत कुटुंबाच्या ताब्यात दिले.

मोहिते, आबनावे, म्हस्के यांनी प्रसंगाधवान राखत महिलेस आत्महत्येपासून परावृत्त केले. या कामगिरीमुळे “क्रिएटीव्ह वुमेन ग्रुप’च्या प्राची दासवानी, अतुल दासवानी, पाच वर्षांची मिशिका दासवानी यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची भेट घेतली. त्यांना आभाराचे प्रशस्तिपत्र दिले. लहानग्या मिशिकाने पोलीस आयुक्तांचे आभार मानले. दरम्यान, महिलेचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा डॉ. वेंकटेशम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.