महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती
पुणे – काही करोना संशयित व्यक्ती “आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या काही खासगी लॅब, पालिकेच्या चाचणी केंद्रांवरही करोनाची चाचणी करून घेत आहेत. अशा व्यक्तींचा खासगी तपासणी अहवाल निगेटिव्ह आणि “एनआयव्ही’ अर्थात राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास “एनआयव्ही’चा अहवाल अंतिम मानण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने अनेक नागरिक भीतीपोटी महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये जात आहेत. या नागरिकांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षातच ठेवले जाते. मात्र, अनेकजण स्वत:च्या घरात विलगीकरणाची सुविधा असल्याने, तसेच कुटुंबाची तपासणी केल्याने अहवाल येईपर्यंत घरीच राहण्यासाठी हमीपत्र देऊन घरी येत आहेत. त्यात, काही व्यक्ती घरी आल्यानंतर खासगी प्रयोगशाळेतही करोना चाचणीसाठी नमुने देत आहेत. त्यात, काही प्रकरणांमधे “एनआयव्ही’चे नमुने पॉझिटीव्ह, तर खासगी प्रयोगशाळेचे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिक खासगी अहवाल गृहित धरून पालिकेकडे उपचारासाठी जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये वाद होत असून, पोलीस बंदोबस्त आणून अशा बाधितांना उपचारांसाठी नेले जात आहे.
एकाच व्यक्तीने शासकीय तसेच खासगी प्रयोगशाळेसाठी नमुने दिले असतील, तरी चाचण्यांच्या वेळा, आरोग्य स्थिती, चाचणीचा प्रकार यामुळे अहवाल वेगवेगळे येणे शक्य आहे. मात्र, “आयसीएमआर’च्या नियमांनुसार “एनआयव्ही’चा अहवालच अंतिम असेल. त्यानुसार आरोग्य यंत्रणेकडेच संबंधितांना उपचार घेणे बंधनकारक आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, मनपा