नवी दिल्ली: मूळ भारतीय असलेल्या एकूण 155 कंपन्यांनी अमेरिकेत तब्बल 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे त्यामुळे अमेरिकेत 1 लाख 25 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत अशी माहिती भारतीय उद्योग महासंघाच्या एका अहवालात देण्यात आली आहे.
या कंपन्यांमध्ये ज्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाल्या आहेत त्यात टेक्सासमध्ये 17578 नोकऱ्या निर्माण झाल्या, कॅलिफोनिर्यात 8271 जणांना रोजगार मिळाला, न्युजर्सीत 8057 जणांना, न्युयॉर्कमध्ये 6175 जणांना तर फ्लोरिडामध्ये 5454 जणांना नव्याने नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत अशी माहिती यात देण्यात आली आहे.
या भारतीय कंपन्या पुढील पाच वर्षात अमेरिकेत आणखी गुंतवणूक करणार असून अधिक कर्मचारी ते तेथे कामावर घेण्याचे नियोजन करीत आहेत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील औषध उत्पादन, दूरसंचार, संरक्षण, वित्तीय सेवा, पर्यटन, अभियांत्रिकी, वाहन उद्योग, अन्न आणि कृषी उद्योग इत्यादी क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायचे योजले आहे.
अमेरिकेच्या प्रशासनानेही भारतीय गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवल्याने ही गुंतवणूक भारतीय उद्योगांसाठीही किफायतशीर ठरत आहे असे भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत संधु यांनी म्हटले आहे.