Coronavirus | देशासाठी पुढील 4 आठवडे अत्यंत महत्त्वाचे – डॉ. पॉल

नवी दिल्ली – देशातील करोनाची स्थिती खूपच वाईट असून पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा केंद्र सरकारने मंगळवारी दिला. गेल्या 24 तासांत भारतात 97 हजार नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ करोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, ही साथ गेल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. काही राज्यांत स्थिती अधिक वाईट असली तरी बाधितांमध्ये संपूर्ण देशात वाढ होत आहे.

पॉल म्हणाले, देशासाठी चार आठवडे खूप महत्वाचे असून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी जनतेचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. जर संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाचे मोठे नुकसान होईल. करोनाशी लढण्यातील शस्त्रे तीच आहेत. योग्य वतर्णूक, प्रतिबंधात्मक उपाय, योग्य चाचण्या, वैद्यकीय सुविधांत वाढ, आणि लसीकरणाची गती वाढवा हेच ते उपाय आहेत.

महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तिसगढमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पंजाब आणि छत्तिसगढमध्ये मृतांची संख्या चिंतेचे कारण आहे तर महाराष्ट्रात बाधितांची संख्या चिंतेचे कारण आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.

महाराष्ट्रात चाचण्यांची सरासरी कमी
महाराष्ट्रामध्ये देशातील सक्रिय बीाधतांपैकी 58 टक्के बाधित आहेत. तर मृतांधील संख्या 34 टक्के आहे. राज्यातील भौगोलिकदृष्ट्या अवघड जागी मोबाईल टेस्ट लॅब उभाराव्यात . त्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषद योग्य ती सामुग्री परवेल, असे आम्ही त्या राज्याला सुचवले आहे.

छत्तिसगढ हे लहान राज्य असूनही देशातील बाधितांमध्ये त्यांची संख्या सहा टक्के आहे. तर मृतांमध्ये तीन टक्के प्रमाण आहे. तर देशातील मृतांमध्ये 4.5 टक्के संख्या पंजाबमधील आहे. त्या तुलनेत दिल्ली आणि हरियाणातील ही संख्या कमी आहे. मात्र तेथे आरटी पीसीआर चाचण्यांची संख्या 76 टक्‍क्‍यांनी वाढवली आहे, ही समाधानाची बाब आहे, असे भूषण म्हणाले.

या तीन राज्यांत वेगाने वाढणाऱ्या संसर्गाच्या जिल्ह्यात नेमणूकीसाठी केंद्राने 50 सार्वजनिक आरोग्य पथके तैनात केली आहेत. ही पथके महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात, छत्तीसगढमधील 11 आणि पंजाबमधील नऊ जिल्ह्यात तैनात करण्यात येतील.

देशांत 96 हजार 982 नवे बाधित नोंदवण्यात आले. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 446 होती. त्यापैकी महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 47 हजार 288 होती. छत्तिसगढमध्ये वाधितांची संख्या सात हजार 302 ने वाढली. तर, कर्नाटकने पाच हजाराचा टप्पा पार केला. महाराष्ट्रात 164 जण करोनामुळे मृत्यूमुखी पडले तर पंजाबमध्ये मृतांची संख्या 71 होती. त्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या एक कोटी 26 लाख 86 हजार 547 वर पोहोचली. तर 43 लाख जणांनी सोमवारी लस घेतली. त्यामुळे करोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांची संख्या 8 कोटी 31 लाख 10 हजार 926 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.