बंगळुरू – कॉंग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर जाण्याबाबतचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो अशा बातम्या काही माध्यमांतून झळकल्या आहेत. मात्र कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हे वृत्त निराधार असल्याचे नमूद करत फेटाळून लावले आहे. अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत आणि त्यांना कर्नाटकातून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशा बातम्या आहेत. त्यासंदर्भात बोलताना शिवकुमार म्हणाले की हे पूर्ण चुकीचे आहे आणि ज्याची कोणतीही चर्चाच झाली नाही अशा बातम्या माध्यमांकडून दिल्या जात आहेत.
दरम्यान, मंड्या जिल्ह्यातील केरागुडु येथे हनुमान ध्वज हटवण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांवर टीका केली. अशांतता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी असले प्रकार केले जात आहेत. ग्रामीण भागातील साध्या भोळ्या नागरिकांचा त्यासाठी वापर करून घेतला जातो आहे. दक्षिण कर्नाटक भागात विशेषत: जुन्या जुन्या म्हैसूर भागात सगळ्या जाती धर्मांचे नागरिकत गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र आता तेथे नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
केरागुडु पंचायतीने संबंधित संघटनेकडून असे वचन घेतले होते की ते राष्ट्रध्वज आणि कर्नाटक ध्वजाशिवाय अन्य कोणता ध्वज तेथे फडकवणार नाहीत. कर्नाटक सरकार राष्ट्रध्वज आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबध्द आहे. मांड्यातील अधिकाऱ्यांनी हनुमान ध्वजाच्या जागेवर तेथे राष्ट्रध्वज फडकावला आहे असेही शिवकुमार यांनी सांगितले.