राष्ट्रवादीचे कार्यालय पुण्याच्या विकासाला गती देईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवीन शहर कार्यालय पुणे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय विकासाला गती देणारे व्यासपीठ असेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.

पक्षाच्या डेंगळे पुलाशेजारील कार्यालयाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तसेच हे कार्यालय सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांना सन्मान आणि न्याय देणारे असेल,अशाच पध्दतीने या ठिकाणी कामकाज होईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार ऍड. वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, “पक्षासाठीचे हे कार्यालय शहरासाठी मोलाची भूमिका बजावणारे ठरणारे आहे. संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते हे पक्षाचे प्रमुख घटक असून त्यांच्या माध्यमातून या कार्यालयाचे कामकाज चालायला हवे.

त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी सर्वांना न्यायाची वागणूक द्यावी. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटावेत ही अपेक्षा आहे. त्यासाठी येथे कोणीही गटातटाचे राजकारण करू नये, वाद घालू नयेत, असा सल्लाही पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. तसेच या कार्यालयात आठवड्यातून दोनवेळा आपल्या कार्यालयाचे कर्मचारी जनतेची निवेदने घेण्यासाठी असतील.

पक्षासाठी शहरात मोठ्या कार्यालयाची गरज होती. त्यातून हे कार्यालय उभे राहिले असून, त्यासाठी पक्षाच्या छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्वांनी मदत केली आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले.

शहरातील गेल्या दीड दशकांचा विकास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पालकमंत्री अजित यांच्या पुढाकारातून झाला असून, शहरासाठी सातत्याने विकासाच्या नवनवीन संकल्पना मांडल्या जात आहेत. त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती देण्यासह, कार्यकर्त्यांना बळ देऊन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या कार्यालयात असतील, असेही जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी, तर आभार दीपाली धुमाळ यांनी आभार मानले.

अजित पवारांनी व्यक्‍त केली खंत
या कार्यक्रमास गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच खंत व्यक्त केली. “रुग्ण कमी झालेले असले, तरी करोना संकट संपलेले नाही. त्यामुळे गर्दी करू नये असे आम्हीच सांगतो. मात्र, या कार्यक्रमास झालेली गर्दी आणि नियमांचे उल्लंघन पाहता, मी खंत व्यक्त करतो’ असे पवार म्हणाले.

या कार्यालयाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व्हावे, अशी माझी इच्छा होती. मात्र, करोनामुळे आम्ही नको म्हणालो, तसेच गर्दी नको म्हणून सकाळी सात वाजताच उद्‌घाटन घेण्याचा मानस होता. मात्र, त्याच वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, उद्‌घाटन करावे की नको अशी माझी प्रत्येकवेळी कोंडी होते,’ असे सांगत पवार यांनी गर्दीबाबत दोनवेळा खंत व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.