राष्ट्रवादी पक्षाची अवस्था म्हणजे ‘गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला’

– योगेश मारणे

न्हावरे – गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला, अशी अवस्था महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे. अशी टीका माजी मंत्री व भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून लोक भाजप-शिवसेनेत का? जात आहेत याचा विचार त्या पक्षाच्या नेत्यांनी करावा, असाही सल्ला धस यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धस यांनी कधी आक्रमक पणे तर कधी भाषणामध्ये मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है, दिलके तुकडे हजार हुए, कशी नशीबाने थट्टा मांडली यासारखी चित्रपटातली गाणी म्हणत आपल्या मिश्किल शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

शिरुर(जि. पुणे) येथील न्हावरे येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री धस बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलताना माजी मंत्री धस यांनी दोनही पक्षांना वैतागवाडी सहकारी संस्था असे संबोधले. त्यांच्याकडे कामापेक्षा इतर वैतागतच जास्त असल्यामुळे त्यांचे नेते पक्ष सोडून इतर पक्षात जात आहेत.तर सर्व सामान्य जनता त्यांना वैतागली आहे.केवळ जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या भाजप-सेना सरकारला मोठ्या प्रमाणावर जनता साथ देत आहे असेही धस यांनी सांगितले.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचा इतिहास, भूगोल माहीत नसल्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. देशातील महापुरुषांवर एखादे स्क्रिप्ट पाठांतर करुन भूमिका करणे वेगळे आणि प्रत्यक्ष राजकारण करणे वेगळे. यात खूप फरक आहे. कारण राष्ट्रवादीत काहीही स्क्रिप्ट लिहून देणारे लोक आहेत, असाही टोला धस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. त्यामुळे जरा जपून बोलत चला असा सल्ला आमदार धस यांनी खासदार कोल्हे दिला.

यावेळी भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हस्कुअण्णा शेंडगे, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)