पुणे – एका तरुणाच्या नादी लागल्याने 15 वर्षांपासूनचे अनैतिक संबंध तुटले. याचा राग मनात धरून एकाने संबंधीत तरुणाचा खून केला. दरम्यान, संशयीत आरोपींनी दृश्यम चित्रपटातील घटनांप्रमाणे वेगवेगळी वळणे देत पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखताच ते सुतासारखे सरळ होत खुनाची कबुली दिली.
मुंबई-बंगळुरु महामार्गावर पोत्यामध्ये एक अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याच्या अंगांवर कपडे नसल्याने त्याची ओळख पटवणे हे पहिले आव्हान होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यावर प्रथम मृताची ओळख पटवली. अमर अंकुश क्षिरसागर (21, रा. गंजपेठ) असे मृताचे नाव होते. तो महापालिका उद्यान विभागामध्ये माळीकाम करत होता.
त्याच्या खुनाचे कारण शोधत असताना पोलिसांना त्याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समजले. हा धागा पकडून शोध घेत असतानाच पोलीस कर्मचारी प्रदीप शिंदे यांना अमरचा खून महिलेच्या एका नातेवाईकाने केल्याचे समजले.
त्यानुसार महापालिकेत बिगारी काम करणाऱ्या रोहिदास पांडुरंग पाटोळे (47, रा. सूपर बिबवेवाडी) याला पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले. रोहिदासने हा खुन त्याचा पुतण्या कुणाल देवीदास पाटोळे (21) त्याचे मित्र प्रविण दिलीप शिंदे (26, रा. अपर कोंढवा रोड, बिबवेवाडी), ओंकार रवींद्र सारके (22, रा.बिबवेवाडी) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.