पिंपरी – हजारो उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असतानाही क्वचित पिंपरी-चिंचवडमध्ये हवेच्या गुणवत्तेची पातळी धोकदायक स्थितीत पोहचते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रदुषणात वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी (दि.9) केंद्र सरकारच्या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या सफर ऍपने निगडी येथील हवा पिंपरी-चिंचवड शहर व आसपासच्या परिसरात सर्वाधिक प्रदुषित असल्याची नोंद केली. तसेच आळंदीतील हवा थोडी बरी असे “सफर’ या “ऍप’वर दाखविण्यात आले आहे. निगडी येथील हवेची गुणवत्ता आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.
दिल्ली आणि मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहराची हवा अधिक प्रदुषित होताना दिसत आहे. शहराच्या वायू प्रदुषणात सतत वाढ होत आहेत. “सफर ऍप’वर हवेची गुणवत्ता व आरोग्यासाठी सल्ला आणि धोका काय आहे हे सांगितले जाते. याचा आढावा घेतला असता शहरातील गुरुवारी हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसून आले असून शहरातील हवा आरोग्यास हानिकारक होईल, अशा स्तरावर पोहचली आहे.
कारणीभूत घटक
शहरातील वाढते औद्योगिकीकरण, वाहन, तसेच थंडीत पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या, घरगुती आणि औद्योगिक घातक कचरा जाळल्याने हवेची गुणवत्ता जास्तच खराब होत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते, असा प्रश्न आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना
थंडीत शेकोटी पेटविण्याऐवजी गरम कपड्यांचा वापर करावा.
रस्त्याला किंवा इतर ठिकाणी कचरा पेटवू नये.
सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटवला असेल तर तो विझवावा.
औद्योगिक कचरा पेटलेला दिसला तर त्याची स्थानिक प्रशासनाकडे तक्रार द्या.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर जास्त करावा.
तक्रारींची दखल घेतली जात नाही
पर्यावरण प्रेमींकडून वायू प्रदुषणाबाबत वारंवार अनेक लेखी तक्रारी, ई-मेल व सारथी ऍपवर केल्या जातात. मात्र, तक्रारींची दखल महापालिका प्रशासन घेत नाही. तसेच जनसंवाद सभेत वारंवार मुद्दे मांडूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे पर्यावरण प्रेमी सांगतात.
सफर ऍपवरील आकडेवारी
शहरातील गुरुवारी निगडीतील हवा सर्वांत जास्त प्रदूषित आढळली. तर, आळंदीतील हवा थोडी बरी होती. त्यानंतर भोसरी व भूमकर चौकाचा नंबर लागतो. सफर ऍपवरील आकड्यांनुसार निगडीतील एयर क्वालिटी इंडेक्स 304, भोसरी 302, भूमकर चौक 249 तर, आळंदीचा 99 इतका होता.