पिंपरी -अनेक रिक्षा चालक आता ओला-उबेरसारख्या बड्या कंपन्यांशी सलंग्न होऊन व्यवसाय करत आहेत. परंतु प्रवाशाने थेट कंपनीला पेमेंट केल्यास ते भाडेच नको, असा हट्ट रिक्षाचालक धरत आहेत.
ओला-उबेर ऍपवर थेट पैसे दिल्यास त्यांच्याकडून आठ दिवसानंतर रिक्षा चालकांना पैसे मिळतात, तोपर्यंत सीएनजी कसा भरायचा, असा सवाल करत आमच्याच अकाउंटला पैसे द्या, असा प्रवाशांकडे आग्रह धरत आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात ओला-उबेर ऍपवरून जागेवरूनच वाहनांची सुविधा उपलब्ध होत आहे. नागरिकांकडून सध्या मोठ्या या कॅब सर्व्हिसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात रिक्षा उपलब्ध होत आहे. इच्छित स्थळी पोहचण्याअगोदर मात्र पैसे देताना ओला-उबेरच्या ऍपवर थेट पैसे न देता आमच्या गुगल पे वर पैसे द्या, अशी मागणी रिक्षा चालक करत आहेत. थेट पैसे कंपनीच्या ऍपद्वारे केल्यास कंपनीकडून आठ दिवसानंतर पैसे भेटत आहे. तो पर्यंत रिक्षामध्ये सीएनजी कसा भरायचा, घरखर्च कसा करायचा असा सवाल रिक्षा चालक उपस्थित करत आहेत. दिवसभरात 25 टक्के नागरिक ऍपद्वारेच ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास प्राधान्य देत असल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले. अनेक रिक्षा चालक स्वतःच्या गुगल पेवर पैसे भरण्यास सांगत आहेत. ते न दिल्यास भाडेच नको, म्हणून रद्द करत आहेत. त्यामुळे प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
पैसे न दिल्यास ऍप बंद
ओला-उबेर ऍपद्वारे नागरिक रिक्षाचे बुकींग करतात. दिवसभरात होणाऱ्या एकूण भाड्यांपैकी सुमारे 70 ते 80 टक्के रक्कम रिक्षा चालकांना मिळते. तर उर्वरीत 20 टक्के रक्कम कंपनीला रिक्षा चालकांना भरावी लागत आहे. प्रवाशांनी थेट कंपनीला ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविल्यास रिक्षा चालकांची रक्कम कंपनी आठ दिवसा नंतर देतात. या उलट कंपनीला मात्र प्रत्येक दिवशी त्यांचे कमिशन द्यावे लागते. अन्यथा कंपनी ऍप बंद करत आहेत.
ग्राहकांनी आमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केल्यास आम्हाला पैसे मिळतात. कंपनीच्या ऍपवर पाठविल्यास आम्हाला आठ दिवसानंतर पैसे मिळतात. त्याचा उपयोगच होत नाही. रिक्षामध्ये सीएनजी कसा भरायचा. त्यामुळे भाडे नसलेले चालेल पण पैसे आमच्याच गुगल पे किंवा पेटीएमवर देण्याची विनंती आम्ही करतो.
– संदीप कांबळे, रिक्षा चालक.