नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावणारी खेळाडू दिव्या काकरानचा मुद्दा अचानक तापला आहे. या खेळाडूला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने ट्विटरवर आपण कोणत्या राज्याकडून खेळता असा सवाल विचारला व त्यावरूनच आता भारतीय जनता पार्टीने आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे.
दिव्या काकरानला काही आर्थिक मदतीची गरज आहे. त्याकरता त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे ट्विटद्वारे मागणी केली होती. त्याला केजरीवाल यांनी स्वत: काही उत्तर दिले नाही. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी उत्तर दिले. त्यांनी अगोदर दिव्याने देशाचा मान वाढवला असल्याचे नमूद करत तिची प्रशंसा केली आहे. मात्र, त्याचवेळी कोणत्या राज्याकडून खेळते असा सवाल केला. तू दिल्लीकडून कधी खेळली असल्याचे आपल्याला आठवत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. त्याही पुढे जाऊन ते म्हणाले की, तुम्ही उत्तर प्रदेशकडून खेळता. जर योगी आदित्यनाथ तुमचा सन्मान करत नसतील तर दिल्लीचे मुख्यमंत्री तुमचे नक्की ऐकतील, अशी आणखी एक टिप्पणी केली.
दिव्याचे प्रत्युत्तर
सौरभ भारद्वाज यांना दिव्याने ट्विटद्वारेच उत्तर दिले आहे. आपण खेळात दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्याचे व त्यावेळी मिळवलेल्या विजयाशी संबंधित कागदपत्रेही तिने शेअर केली आहेत. आपण 2011 ते 2017 या काळात दिल्लीकरताच खेळल्याचे नमूद करत त्याचे सर्टिफिकेटही तिने जारी केले आहे. या काळात आपण 17 सुवर्णपदके जिंकली असून त्याचेही सर्टिफिकेट सादर करू का, अशी विचारणा तिने केली.
दरम्यान, आपने योगी सरकारचे नाव घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीही यात उतरली. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी भारद्वाज यांना लक्ष्य करतानाच हा खेळाडूंचा, देशाच्या युवकांचा आणि तिरंग्याचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्टेडियम असो की युद्धभूमी हे लोक देशासाठी आणि तिरंग्यासाठी लढत असतात. तुम्ही कोणत्या राज्याच्या आहात असे दिव्या यांना भारद्वाज यांनी विचारणे आणि केजरीवाल यांनीही त्यांना न रोखणे यातून आम आदमी पक्षाची नियत दिसते. ते याचसाठी ओळखले जातात असा टोला त्यांनी लगावला.