सदाशिव पेठेतील दुकानांसाठी कडक नियम
करोना रुग्ण आढळल्यानंतर व्यवहार होते बंद
पुणे – सदाशिव पेठेतील होलसेल औषध बाजारात करोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर तीन दिवस हा बाजार पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. आता सोमवारपासून येथील व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक नियम लागू केले असून, त्याचे पालन न केल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई अटळ आहे.
सदाशिव पेठेत औषधांचे होलसेल मार्केट आहे. येथून शेकडो औषध दुकानांना डिलिव्हरी बॉयमार्फत माल पुरविण्यात येतो. याच बाजारातील एक व्यापारी आणि दुकानातील कामगारांना करोना संसर्ग झाल्यावर येथील व्यवहार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले. यासंदर्भात रविवारी पालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन अधिकारी व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसारकाऊंटरवरून कुठल्याही औषधाची थेट विक्री होणार नाही. तसे आढळल्यास व्यापाऱ्यावर कारवाई होणार आहे.
असे असतील औषध पुरवठ्याचे नियम
– मालाची ऑर्डर ऑनलाइनच स्वीकारण्यात येणार. ठरलेल्या तारखेनुसार औषधांचे वितरण डिलिव्हरी बॉयमार्फतच होणार.
– ज्या व्यापाऱ्यांनी ऑर्डर नोंदविल्या, त्यांच्यासाठी नेहरू स्टेडियम गेट नं.3, डी.पी. रोड म्हात्रे पूल, सेंट्रल पार्क-डेक्कन येथे मालाचे वितरण होणार.
– डिलव्हरी बॉयने सदाशिव पेठेत न येता वरील तीन ठिकाणांहून माल घ्यायचा आहे.
– प्रत्येक व्यापाऱ्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांची दररोज आरोग्य तपासणी बंधनकारक
– मास्क, हॅन्ड सॅनिटायझर वापरणे बंधनकारक.
– एखादा कर्मचारी जर कंटेंमेंट झोनमध्ये राहत असेल, तर त्याला पगारी सुट्टी देण्यात यावी.